काय उपचार करूं पांडुरंगा
काय उपचार करूं पांडुरंगा ।
हेंचि मज सांगा विचारूनी ॥१॥
कोणता पदार्थ उणा तुजपासी ।
बोलाया वाचेशीं मौन पडे ॥२॥
शंकर-शेषादि करिती स्मरण ।
तेथें माझें मन गाऊं शके ॥३॥
इंद्र सुरवर वाहती सुमनें ।
तेथें म्यां वाहणें काय एक ॥४॥
परीं आवडीनें जोडूनी ओंजळ ।
बुका वाहूं माळ तुळसीची ॥५॥
उणें पुरें तुम्ही करूनियां सांगा ।
जिवालागीं मग सुख तेव्हां ॥६॥
तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना ।
तुम्ही नारायणा सेवकाची ॥७॥