पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी
पहाटेच्या प्रहरीं म्हणा हरि हरी ।
तया सुखा सरी नाहीं दुजें ॥१॥
केशव वामन नारायण विष्णु ।
कृष्ण संकर्षणु राम राम ॥२॥
माधवा वामना श्रीधरा गोविंदा ।
अच्युत मुकुंदा पुरुषोत्तमा ॥३॥
नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा ।
हृषीकेशा पावा स्मरणमात्रें ॥४॥
तुका म्हणे एका नामीं भाव ।
राहे होय साह्य पांडुरंग ॥५॥