कैसें करूं ध्यान कैसा पाहूं तुज
कैसें करूं ध्यान कैसा पाहूं तुज ।
वर्म दावी मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा ।
कोण्या भावें देवा आतुडसी ॥२॥
कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षीं जाणूं ।
जाणुं हा कवणूं कैसा तुज ॥३॥
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं ।
कैसी स्थिति मति न कळे मज ॥४॥
तुका म्हणे जैसें दास केलें देवा ।
तैसें हें अनुभवा आणीं मज ॥५॥