इतुकें करीं देवा ऐकें वचन
इतुकें करीं देवा ऐकें वचन ।
समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥
इतुकें करीं देवा आइकें हे गोष्टी ।
सर्व समदृष्टी तुज देखें ॥२॥
इतुकें करीं देवा विनवितों तुज ।
संतचरण रज वंदी माथां ॥३॥
इतुकें करी देवा आइकें हे मात ।
हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥४॥
भलतियां भावें तारी पंढरीनाथा ।
तुका म्हणे आतां शरण आलों ॥५॥