आवडे हें रूप गोजिरें सगुण
आवडे हें रूप गोजिरें सगुण ।
पाहतां लोचन सुखावले ॥१॥
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे ।
जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥२॥
लांचावलें मन लागलीसे गोडी ।
ते जीवें न सोडी ऐसें झालें ॥३॥
तुका म्हणे आम्हीं मागावें लडिवाळी ।
पुरवावी आळी मायबापें ॥४॥