अगा महाविष्णु अनंत भुजांच्या
अगा महाविष्णु अनंत भुजांच्या ।
आम्हां अनाथांच्या सोयरीया ॥१॥
न कळे महिमा वेद मौनावती ।
तेथें माझी मति कोणीकडे ॥२॥
काय म्यां वर्णावें तुझ्या थोरपणा ।
सहस्रवदना शक्ति नव्हे ॥३॥
रविशशी जेथें तेजें सामावती ।
तेथें माझी मती कोणीकडे ॥४॥
तुका म्हणे आम्ही बाळ तूं माऊली ।
करावी साउली करुणेची ॥५॥