तीर्थांचें जें मूळ व्रतांचें जें फळ
तीर्थांचें जें मूळ व्रतांचें जें फळ ।
ब्रह्म तें केवळ पंढरीये ॥१॥
तें आम्हीं देखिलें आपुले नयनीं ।
फिटलीं पारणीं लोचनांचीं ॥२॥
जिवींचा जिव्हाळा सुखाचा शेजार ।
उभें कटीं कर ठेवूनियां ॥३॥
जगाचा जनिता कृपेचा सागर ।
दीनां लोभपर दुष्टां काळ ॥४॥
सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं ।
आकार निर्गुणीं तोचि असे ॥५॥
तुका म्हणे नाहीं श्रुती आतुडलें ।
आम्हां सांपडलें गीतीं गातां ॥६॥