माठात भरुनी दही दूध लोणी,
बारा सोळा जणी
निघाल्या मथुरेला गौळणी
।। धृ ।।
चढताना तो मथुरा घाट
घाटा मधली अवघड वाट
कसा अचानक आडवा येतो, कान्हा झुडपांतुनी
निघाल्या मथुरेला गौळणी
।। १ ।।
खट्याळ भारी हा गिरीधारी
गोपिकांना दावी हुशारी
नको नको रे फोडू घागरी, करिती त्या विनवणी
निघाल्या मथुरेला गौळणी
।। २ ।।
नको रे कान्हा हे मधुसूदना
वाटेवरती घालू धिंगाणा
हात जोडुनी शरण आल्या एका जनार्दनी
निघाल्या मथुरेला गौळणी
।। ३ ।।