मजलागीं नाहीं ज्ञानाची ती चाड
मजलागीं नाहीं ज्ञानाची ती चाड ।
वाचे घेत गोड नाम तुझें ॥१॥
नेणतें लेकरुं आवडीचें नातें ।
बोले वचनातें आवडीनें ॥२॥
भक्तिविण कांहीं वैराग्य तें नाहीं ।
घातला विठाई भार तुज ॥३॥
तुका म्हणे नाचूं निर्लज्ज होउनी ।
नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥४॥