हरी नाम जो जो विसरला, तया हसती लोक रे ।
कवडी मोल धन हे सारे, कमविले तू लाख रे ।।धृ।।
कुणाची ही शेतीवाडी, बंगला माडी कुणाची ।
कुणाची ही मोटारगाडी, बैलगाडी कोणाची ।
राहील सारे जाग्यावर, झाल्यावरती राख रे ।।१।।
माय-बापाला छळणारा पुत्र तो नसावा ।
मेल्यामागे तूप-रोटी देणारा नसावा ।
भुकेल्याची भूक जाण, लोभ सारा टाक रे ।।२।।
थंडीमध्ये कुडकुडणारा देह पाहिला तू ।
झाकावया नाही गेला दूर राहिला तू ।
मायेचा उबारा दे तू, लाज त्याची राख रे ।।३।।
आज आहे उद्या नाही, क्षणिक ही काया रे ।
दत्त नामाविण जाई, जन्म सारा वाया रे ।
श्रीधरा परी भक्तीची, गोडी जरा चाख रे ।।४।।