अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन तिन्ही लोका ॥धृ॥
जाईन ग मायें तया पंढरपुरा,
भेटेन माहेरी आपुलिया ॥१॥
सर्व सकुतांचे फळ मी लाहीन,
क्षेम मी देईन पांडुरंगा ॥२॥
बाप रखुमादेवीवरु विठ्ठलाचे भेटी,
आपुलिया सेवेसाठी करूनी ठेला ॥३॥
वैष्णवा घरी सदा सर्व काळ,
घणघणती टाळ ॥धृ॥
कण भाकरीचे खावे,
मुखी रामनाम ध्यावे ॥१॥
द्वारी उभा कामधेनू,
उपवासी तुळशी पालू ॥२॥
फराळाशी तूप लाह्या,
घडोघडी पडती पाया ॥३॥
नामा म्हणे नेणती काही,
चित्त राहो विठ्ठल पायी ॥४॥